परळी वैद्यनाथ (दि. 20) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांच्या हस्ते श्री वैद्यनाथ शेतकरी विकास पॅनलच्या प्रचाराचे नारळ शुक्रवारी (दि.21) रोजी वैद्यनाथ मंदिर येथे सायंकाळी 5.00 वा. फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे.
परळी वैद्यनाथ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात शेतकरी विकास पॅनलच्या प्रचारास शुक्रवारी सायंकाळी शुभारंभ होत आहे.
मागील अनेक वर्षांपासून आ.धनंजय मुंडे यांचे परळी कृषी उत्पन्न बाजार समितीवर एकेरी वर्चस्व राहिलेले आहे. शेतकऱ्यांच्या हितार्थ अनेक निर्णय घेऊन धनंजय मुंडे यांनी या संस्थेला वैभव प्राप्त करून दिलेले आहे.
स्व.पंडित अण्णा मुंडे यांनी त्यांच्या सभापती कार्यकाळात या बाजार समितीला वैभव प्राप्त करून देत एक अनोखी व शेतकरी हिताची परंपरा सुरू केली होती. या बाजार समितीच्या ठेवी आणि अन्य मालमत्ता मिळून शेकडो कोटींची संपत्ती असलेली बाजार समिती अत्यंत समृद्ध म्हणून ओळखली जाते.
या परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आपली सत्ता कायम राखण्यासाठी धनंजय मुंडे हे मैदानात उतरले असून, उद्यापासून (शुक्रवारी) प्रचारास प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे.