तुळजापूर : सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत.
काही दिवसांत आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. प्रत्येक मतदार संघात अनेक इच्छुक उमेदवार आपापल्या पद्धतीने मोर्चे बांधणी करत असून राज्यात सध्या एका अपक्ष उमेदवाराची एका हटके कारणामुळे जोरदार चर्चा आहे.
तुळजापुर मतदार संघातून इच्छुक असलेले अपक्ष उमेदवार अण्णासाहेब दराडे यांनी आपला जाहीरनामा चक्क शंभर रुपयांच्या बॉण्ड पेपर वर नोटरी करून लिहून दिला आहे.
एक दोन नव्हे तर त्यांनी चक्क एक हजार जाहीरनाम्याचे बॉण्ड तयार केले असून गावोगावी जाऊन ते लोकांना बॉण्ड देत आहेत.
अनेकदा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते मोठंमोठ्या घोषणा करतात, आश्वासन देतात परंतु निवडणूक संपल्यावर त्यांना त्याचा विसर पडतो.
तो विसर पडू नये किंवा लोकांनी मला निवडून दिलं तर मी शब्द फिरवू नये याकरिता मी काय कामे करणार हे लोकांना स्टॅम्पवर लिहून देत असल्याचं दराडे यांनी सांगितलं.
त्यांच्या या वेगळया विश्वासाला लोकांमधून ही चांगला प्रतिसाद मिळत असून बॉण्ड घेण्यासाठी लोकं आग्रह करत आहेत.
दराडे यांच्या वेगळ्या पद्धतीमुळे त्यांच्या निवडणुकीची जोरदार चर्चा राज्यभर होत असून त्यांच्या या आवाहनाला लोकं कसा प्रतिसाद देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.