बीड : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे कारण कारवाया केल्या जातात की दाखवल्या जातात हे समजत नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया जवळपास ताळमेळ नसलेल्या असतात की त्याचा ताळमेळ लागु नये म्हणून तशी परिस्थिती निर्माण केली जात आहे असा संशय आता येऊ लागला आहे.
काल स्थानिक गुन्हे शाखेकडून दुचाकी चोरांवर कारवाई केल्याची माहिती मिळाली, ही माहिती पोलिसांनी सांगितली नसून सूत्रांनी दिली आहे, काल केलेली कारवाई बीड तालुका हद्दीत झाल्याचं कळतं, बीड ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत ही कारवाई झाली असल्याची माहिती सूत्रांनी आम्हाला दिली.
यामध्ये कारवाई झाली की नाही हे समजत नाही कारण याबद्दल माहिती देणारी अधिकृत प्रेसनोट पोलिसांनी काढलेली नाही, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख संतोष साबळे यांना संपर्क केला मात्र त्यांनी अनेकवेळा फोन करूनही फोन उचलला नाही त्यामुळे या कारवाईबद्दल त्यांची काय प्रतिक्रिया आहे हे कळलं नाही.
ज्यांनी कारवाई केली ते पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे यांनी अगदी ताळमेळ नसलेली माहिती दिली ती अशी की कारवाई झाली मात्र तारिक किती, वेळ काय होती, ठिकाण कोणते? किती गाड्या? कुठे आहेत यावर काहीही माहिती दिली नाही शेवटी खोदून विच्याल्यानंतर गाड्या शिरूर पोलिस ठाण्यात जमा केल्या असे सांगितले.
खरंतर कारवाई बीड तालुक्यात झाली आणि गाड्या शिरूरच्या ठाण्यात काशाकाय? हे समजले नाही दुसरीकडे कारवाईत ८ गाड्या पकडल्या असल्याची माहिती आम्हाला मिळाली मात्र पोलिस ४ गाड्या सांगतात. बाकीच्या चार कुठे आहेत? अजून गौडबंगाल म्हणजे या गाड्या कोण वापरत होते त्यांच्यावर काय कारवाई केली? याबद्दल काहीही माहिती नाही.
याबद्दल शिरूर पोलिसांना विचारले असता त्यांनी सांगितले एक दुचाकी आमच्या हद्दीतील आहे ईतर कोणत्या हद्दीतील आहेत हे माहिती नाही, गाड्या कोनाकडे होत्या? कोण वापरत होते याबद्दल विचारले तर ते LCB ला माहीत आहे असे ते म्हणाले.
तर दुसरीकडे ज्यांनी कारवाई केली ते पोलिस उपनिरीक्षक संजय तुपे यांच्याकडून जी माहिती मिळाली ती संशयास्पद आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया अशाच सेटलमेंट करून केल्या जातात की काय असा सवाल का उपस्थित होऊ नये?
दरम्यान सर्व गड्या किती होत्या? इतर चार गाड्या कुठे आहेत? ते कोण वापरत होते? यासंदर्भात ठोस माहिती घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.