परळी वैद्यनाथ : मागील वर्षी प्रमाणे याही वर्षी परळी वैजनाथ तालुक्यासह बीड जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई या भागात तसेच मराठवाड्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये मुख्यत्वे सोयाबीन व कापसाच्या पिकाला गोगलगायी नष्ट करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्या आधारे आज मी स्वतः परळी तालुक्यातील काही गावांमध्ये पाहणी केली असता गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला असल्याचे वास्तव आहे. गोगलगायींच्या प्रादुर्भावामुळे एकूण उत्पन्नावर जर परिणाम होणार असेल तर या पिकांचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे केले जावेत व उत्पादनाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करता यावे यासाठी मदत व पुनर्वसन विभागाशी दूरध्वनीवरून बोललो असून उद्या सायंकाळपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश निर्गमित होतील असे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यात दाखल होताच परळी तालुक्यातील बेलंबा, वाघबेट या परिसरातील सोयाबीन, कपाशी आदी गोगलगायीनी प्रभावित झालेल्या क्षेत्राची शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच शेतकऱ्यांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून गोगलगायींना नष्ट करण्याच्या विविध औषधी व उपाययोजनांबाबतही माहिती घेतली.
गोगलगायींना नष्ट करण्यासाठी उपयुक्त ठरणारे मेटाडेल हे औषध बाजारात सहजरीत्या उपलब्ध असून त्याची किंमतही फार जास्त नाही; तेव्हा जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून कृषी विभागाला राखीव ठेवण्यात येणाऱ्या निधीमधून या औषधाची खरेदी कृषी विभागाला करता येईल का? याबाबत चाचपणी करून तातडीने निर्णय घेण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही निर्देश दिले असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे.
पिकं तुडवू नका रे!
दरम्यान बीड जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असून बऱ्याच ठिकाणी उशिरा पेरण्या झालेल्या आहेत. सोयाबीन, कापूस, तूर आदी पिके हे हातभरही उगवलेली नाहीत. अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत पाहणी करण्यासाठी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पदाधिकारी व शेतकरी हे बांधावर आले असता धनंजय मुंडे यांनी “पिकं तुडवू नका रे… आधीच थोडं उगवलं आहे, आपल्या पायांनी आणखी त्यांचे नुकसान करू नका!” अशा सक्तीच्या सूचना सर्वांनाच दिल्या.
दरम्यान या पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर, उपविभागीय अधिकारी श्रीमती नम्रता चाटे, वैद्यनाथ सहकारी कारखान्याचे संचालक अजय मुंडे, परळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यभान नाना मुंडे, बालाजी (पिंटू) मुंडे, वैजनाथराव सोळंके, दिलीप दादा कराड, माणिकभाऊ फड, सुरेश गित्ते, अमर पाटील, हरीश नागरगोजे, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी यांसह पदाधिकारी, तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
कमी पावसाने सध्या पेरण्यांचे प्रमाण कमी आहे, तसेच पाऊस आणखी लांबल्यास दुबार पेरणीचे संकटही येऊ शकते, मात्र अशा परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.