बीड : शहरातील सेंट अँन्स इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थी व पालक यांना नाहक त्रास देत शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करीत असल्या बाबतचे निवेदन आज शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांना दिले या वर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद येथे हजर राहण्याच्या सूचना दव्याव्यात असे आदेश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना दिले आहेत. तर शिक्षण विभाग माध्यमिक ॲक्शन मोड मध्ये येत माध्यमिक शिक्षणाधिकारी नागनाथ शिदे यांनी शाळेला भेट देत प्रचंड नाराजी व्यक्त करत उद्या शाळेच्या चौकशी समिती गठित करणार असल्याचे सांगितले आहे. या प्रसंगी त्यांच्या समवेत तक्रारदार मनोज जाधव, अधीक्षक वर्ग दोन माध्यमिक, अधिकारी खटावकर, उपशिक्षणाधिकारी काकडे, शिक्षण विस्तार अधिकारी देवकते उपस्थित होते.
शिक्षण हक्क कायद्यानुसार राज्यातील सर्व बोर्डाच्या शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशा वेळी लेखी अथवा तोंडी परीक्षा घेता येत नाही. परंतु या शाळेत सर्रासपणे विद्यार्थ्यांची प्रवेशा वेळी लेखी परीक्षा नर्सरी, एलकेजी, युकेजी पासून ते दहावी वर्गा पर्यंत घेतली जाते आणि विद्यार्थी परीक्षेत नापास झाला तर त्याला शाळेत प्रवेश नाकारला जातो. जर विद्यार्थी ३ ते ४ वर्षात लिहू, वाचू शकत असेल तर त्याला या शाळेत हजारो रुपये फी देवून शिकवण्याची गरज काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच शाळांची वेळ जास्त असल्याने विद्यार्थांना मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.
विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे नियोजन नसल्याने विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जाताना वह्या आणि पुस्तके न्यावे लागत आहेत यामुळे दप्तराचे ओझे जास्त असल्याकारणाने त्यांना शारीरिक इजा पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच विद्यार्थ्यांना वेगळी वाकणूक देत विद्यार्थ्यांची वर्गवारी करत त्यांना तुकड्यानुसार वेगवेगळ्या वर्ग खोल्यात बसवले जात आहे. वास्तविक पाहता पाच ते सात वर्षांपासून एकाच तुकडीत आपले शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना अचानक दुसऱ्या तुकड्यात बसवल्यामुळे त्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन अनेक विद्यार्थी शाळेमध्ये जाण्यास नकार देत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याचबरोबर शाळा प्रशासन विद्यार्थी व पालकांना हीन दर्जाची वागणूक देत हम करे सो कायदा या तत्त्वावर चालत आहे. याचा पालकांना आणि विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.