बीड : नगर पालिका निवडणूकीमध्ये नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे एस.सी.महिला प्रवर्गासाठी असल्याने बीड नगर पालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवू इच्छीणार्या सर्व राजकीय पक्षांनी तांत्रिक दृष्ट्या एस.सी.असणार्या नव्हे तर खर्या एस.सी. प्रवर्गातील महिला भगिनीलाच ही उमेदवारी द्यावी असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी म्हटले आहे.
या बाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात अशोक तावरे यांनी म्हटले आहे की, बीड नगर पालिकेचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण एस.सी.महिला प्रवर्गाचे पडल्याने खरे एस.सी. बाजूला पडून तांत्रिक दृष्टया एस.सी. असणारे काही जण सर्व राजकीय पक्षाकडे गर्दी करत आहेत. अनेक जण स्वत: ओपन प्रवर्गातील आहेत मात्र पत्नी एस.सी.प्रवर्गातील केलेली असल्याने तीला उमेदवारी मिळावी, तीला काही कायदेशीर अडचण असेल तर तिच्या बहिणीला मिळावी, सासुला मिळावी, बायकोच्या मावशीला मिळावी म्हणून राजकीय पक्षाकडे अर्ज विनंत्या करीत आहेत. परंतु राजकीय पक्षांनी एकीकडे व्यासपीठावर बोलतांना शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचा जागर करायचा आणि दुसरीकडे एस.सी.महिला प्रवर्गाचे राजकीय आरक्षण ओपनच्या घरात असलेल्या एस.सी.महिलेला द्यायचे, हा एक प्रकारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाशी खेळलेला लंपडावाचा खेळ होऊ शकतो. बीड शहरामध्ये 12 ते 15 पती-पत्नीच्या जोड्या अशा आहेत की, ज्यातील पत्नी एस.सी.आहे मात्र यांना उमेदवारी द्यायची असेल तर खर्या एस.सी.वर तो जाणीवपूर्वक केलेला अन्याय ठरेल. यातील अनेक जण आपल्या वेगवेगळ्या व्यवसायाला गती देण्यासाठी आणि गेल्या 25 वर्षात बीड शहरातील जागांचे झालेले घोटाळे दडपण्यासाठी बीड पालीकेत अनैसर्गिक मार्गाने जावू इच्छीत आहेत. परंतु बीड मधील सुजान मतदार ही तांत्रिक कुरघोडी कधीच खपवून घेणार नाही तो खर्या एस.सी.प्रवर्गाच्या पाठीशी नक्कीच ठामपणे उभा राहील यात शंका नाही. माझी सर्व राजकीय पक्षांना विनंती आहे की, एरवी पाच वर्षे दलीत उध्दाराच्या गप्पा मारायच्या आणि दलीतांना कायद्याने प्रतिनिधीत्व देण्याची वेळ आली की, कायद्याशी तांत्रिक कुरघोडीचा खेळ खेळून आपल्याच सग्या-सोयर्यांच्या घरात कुठे दलीत आहे हे पाहून न्याय करायचा हे चुकीचे आहे. ते संविधानाच्या विरोधात आहे आणि हे कोणालाही रुचणारे नाही. त्यामुळे ज्या-ज्या राजकीय पक्षांना बीड नगर पालीकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवायची आहे त्या राजकीय पक्षाने ती कायद्या प्रमाणे एस.सी.प्रवर्गातील आणि कसलेही धर्मांतरण न केलेल्या एस.सी.भगिनीच्या माध्यमातून लढवावी नसता तांत्रिक उमेदवारी दिली गेली तर त्या उमेदवाराचा व त्याच्या राजकीय पक्षाचा पराभव निश्चित होईलच पण अशा राजकीय पक्षाचे बेगडी दलीत प्रेम उघडे पडल्याशिवाय रहाणार नसल्याचे मनसेचे राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे यांनी म्हटले आहे.

















