बीड : शरद पवारांचं वय झालंय वयानुसार नेता बदलणे आवश्यक आहे असं स्टेटमेंट अमरसिंह पंडित यांनी केलं होतं त्यानंतर १७ ऑगस्ट च्या बीड येथील सभेमध्ये खासदार शरद पवार यांनी अमरसिंह पंडितांना खोचक टोला लागावत विचारलं की तुम्ही वय झालं म्हणताय तुम्ही माझं काय बघितलंय त्यांनतर महाराष्ट्रात चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर आता अमरसिंह पंडित यांनी भावनीक पोस्ट केली आहे.
अमरसिंह पंडित यांची जशास तशी पोस्ट
श्रध्देय साहेब,
काल, आज आणि भविष्यातही तुमच्याबद्दल श्रध्दा आणि आदर कायम राहील. कालच्या सभेत आपण माझ्या तोंडी घातलेल्या वाक्याबाबत मी स्वप्नातही तसा विचार करू शकत नाही. आपल्या कानी कोणी काय घातले हे मला माहित नाही, त्याविषयी जाणून घेण्यात स्वारस्यही नाही मात्र हे अत्यंत क्लेषदायक आहे, एवढेच सांगतो.
आम्हा भावंडांवर श्री.शिवाजीराव पंडित यांचे संस्कार आहेत, त्यामुळे केवळ तुमचे वय झाले म्हणून नेतृत्व बदल केला असे तोडके विचार आमच्या मनी येणार नाहीत. याबद्दल सार्वजनिक ठिकाणी सोडा परंतु वैयक्तिक सुध्दा कोणाला बोललेलो नाही. तुम्हाला शंभर वर्षे निरामय आयुष्य लाभो हीच सदैव भवानी चरणी प्रार्थना आहे. तुमच्या सोबत अनेक वर्षे निष्ठेने काम करताना अनेक संधी आणि प्रलोभने मिळाली मात्र त्यावेळी कधीही डगमगलो नाही, तुमची साथ सोडली नाही. राजकारणाच्या पलिकडे जावून पवार परिवाराशी शिवछत्र परिवाराचा स्नेहबंध, तो भविष्यातही जपणार आहे.
तुम्ही आणि अजितदादा वेगळे व्हावेत हेच मुळात पटत नाही… असो, राजकीय निर्णय घेताना वैयक्तिक लाभाचा विचार कधीच मनाला शिवला नाही, लाभापायी काही निर्णय घेणार नाही याची खात्री तर तुम्हालाही असेल. बाकी माणुसकी वगैरे जपणारच कारण तुमचेच राजकीय संस्कार आहेत.
– अमरसिंह पंडित
Sharad Pawar