सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रियेमध्ये बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळविणाऱ्या २ उमेदवारांवर सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात फसवणुकी अंतर्गतगुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली
महाराष्ट्र शासनाकडून पोलीस शिपाई भरती २०२१ प्रक्रिया माहे नोव्हेंबर २०२२ पासून माहे मे २०२३ या कालावधीमध्ये पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हयामध्ये राबविण्यात आली. सदरच्या भरती प्रक्रियेमध्ये कागदपत्रांची छाननी, मैदानी चाचणी परिक्षा, लेखी परिक्षा व वैद्यकिय चाचणी घेवून उमेदवारांना पात्र, अपात्र ठरविण्यात आले. उमेदवारांकडून प्राप्त कागदपत्रांची छाननी करण्यात आल्यावर त्याची सत्यता पडताळणी करीता संबंधीत विभागांकडे पाठविण्यात आली. लातूर व बिड जिल्ह्यातील २ उमेदवारांनी बनावट भूकंपग्रस्त प्रमाणपत्र व बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पोलीस भरतीकरिता सादर केल्याचे पडताळणीमध्ये निष्पन्न झाले.
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सदर प्रकरणाची गंभिर दखल घेवून शासनाची फसवणुक करणाऱ्या उमेदवार व त्यांना या कामामध्ये मदत करण्याऱ्या इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निगमित केले. त्यानुसार उमेदवार नाव ज्ञानेश्वर भाउसाहेब सातपुते, रा. ठी. जांब, शिरूर कासार, जिल्हा- बिड याच्या विरोधात गुन्हा नोंद क्र. ५५/२०२३ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच उमेदवार नाव कृष्णा राजेंद्र राचमले, रा. ठी. मावलगाव, अहमदपूर, जिल्हा लातूर याच्या विरोधात गुन्हा नोंद क्र. ५६/२०२३ कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१,३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे यांच्याकडून करण्यात येत आहे. गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्याकरीता तपास पथके रवाना करण्यात आलेली आहेत.