बीड : इंग्रजी ही ‘ग्लोबल लँग्वेज’ आहे आणि ती अवगत असणं ही काळाची गरज असून हे प्रशिक्षण पूर्ण केल्याने कायमस्वरूपी रोजगाराची दारे खुली होऊ शकतात, ज्यामुळे करिअरच्या परिपूर्ण प्रवासासाठी टप्पा निश्चित होईल असे प्रतिपादन प्रा. राठोड यांनी केले येथील देवगिरी प्रतिष्ठाण संचलित तुलसी संगणकशास्त्र आणि माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड यांच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी साठी ६ महिने इंग्रजी विषयाचे परिपूर्ण ज्ञान आणि इंग्रजी भाषा अवगत होण्यासाठी “संडे इज कम्युनिकेशन डे” मोहिमे अंतर्गत महाविद्यालयात प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात आले आहे. याचे उदघाट्न प्रा.अर्जुन राठोड यांचे हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवगिरी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. प्रदीप रोडे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना प्रा. राठोड म्हणाले की, आज ज्याचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, तो उत्तम प्रकारे कोणत्याही ज्ञानक्षेत्रात प्रगती करू शकतो. समाजात वाढत असलेल्या बेरोजगारीवर भाष्य करताना अनेक उदाहरणे देत प्रा.राठोड यांनी खंत व्यक्त केली .आज स्पर्धेच्या जगात दर्जेदार शिक्षण व स्पर्धातम्क ज्ञान मिळविण्यासाठी येथील युवकांना पुणे ,नाशिक ,मुंबई ,यासारख्या महानगरात जावे लागत आहे. मात्र बीड सारख्या शहरात तुलसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना “संडे इज कम्युनिकेशन डे” च्या माध्यमातून इंग्रजीचे मोफत प्रशिक्षण सुरू करून खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्या करिअरला नवीन उंचीवर नेण्यासाठी जास्तीत -जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन देखील त्यांनी केले.या प्रशिक्षणासाठी सीईटी परीक्षा घेण्यात आली होती. सीईटी ला प्रविष्ट विद्यार्थ्यामध्ये चुरस दिसून आली या सीईटी परीक्षेला २०२ जण विद्यार्थी बसले होते. त्यापैकी पात्र झालेल्या ६० विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड करण्यात अली. या उपक्रमांचे नियोजन प्राचार्य डॉ.एल.एम.थोरात तसेच डॉ. विकास वाघमारे, प्रा.अंकुश सुर्वे यांनी केले.