बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी बीड शहरात जम बसवल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवलेला आहे. ग्रामीण भागातून चार पंचायत समिती सदस्य आणि शहरातील एका आमदार संदीप क्षीरसागर समर्थक असलेल्या बड्या कार्यकर्त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. हा प्रवेश सोहळा मुंबईत पक्ष कार्यालयात बुधवारी (दि.१३) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
आमदार संदीप क्षीरसागर यांचे निकटवर्तीय असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांच्यासह ढेकणमोहचे पंचायत समिती सदस्य सुधीर काकडे, बोरखेडचे सुनील झोडगे, बहिरवाडीचे मोहन देवकते, ताडसोन्नाचे किशोर झुळूक या पंचायत समिती सदस्यांचा पक्ष प्रवेश झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी आजी-माजी पदाधिकार्यांसमवेत प्रवेश केला. त्यानंतर बीडमध्ये झालेल्या उत्तरदायित्व सभेत त्यांना मिळालेले स्थान, त्यांच्या कार्यालयास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बीडमध्ये आलेल्या सर्वच मंत्र्यांनी लावलेली हजेरी हे सर्व पाहता पक्षश्रेष्टींकडून त्यांना बळ दिले जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर आता बीड शहरासह ग्रामीण भागातून अनेकजण पक्ष प्रवेशाची इच्छा व्यक्त करत आहेत. त्यापैकी आजघडीला 4 पंचायत समिती सदस्यांसह आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अशोक वाघमारे यांचा पक्ष प्रवेश केला. या सर्वांचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि युवा नेते डॉ.योगेश क्षीरसागर यांनी पक्षात स्वागत केले. यावेळी बीड मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
बीड मतदारसंघात ग्रामीण भागातून इनकमिंग
ग्रामीण भागामध्ये डॉ.योगेश क्षीरसागर यांची पॉवरफुल एन्ट्री झाली आहे. बीड शहरात जम बसल्यानंतर आता ग्रामीण भागातून पदाधिकार्यांचे प्रवेश होत आहेत. आमदार संदीप क्षीरसागर यांचे समर्थक त्यांची साथ सोडत असून डॉ.योगेश क्षीरसागर यांचे नेतृत्व स्वीकारत आहेत. आगामी काळात आणखी काही प्रवेशाची शक्यता दिसून येते.