पूणे : महसूल विभागाच्या वतीने राज्यातील रिक्त असलेल्या ४ हजार ४६४ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका न काढता एकच प्रश्नपत्रिका काढली जाणार आहे.
विशेष म्हणजे एका परीक्षार्थी उमेदवाराला एकाच जिल्ह्यात अर्ज करून परीक्षेमध्ये भाग घेता येणार आहे. तलाठी संवर्गातील क गटातील पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यास परवानगी देण्यात आली आहे. तलाठी भरती संदर्भातील प्रारूप जाहीर करण्यात आले आहे. राज्यात एकूण ४ हजार ४६४ तलाठ्यांची पद रिक्त असून, त्यासाठी ही भरती होणार आहे. राज्याच्या जमाबंदी आणि भूमी अभिलेख विभागाने येत्या २० जूनपासून भरतीसाठी लिंक खुली करण्याची परवानगी शासनाला मागितली आहे. लिंक खुली झाल्यानंतर उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
आजपर्यंतच्या तलाठी भरती परीक्षांमध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रश्नपत्रिका काढून परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यंदा भूमी अभिलेख विभागाने भरती आणि परीक्षेची कार्यवाही करण्याचे काम टीसीएस कंपनीला दिले आहे. तलाठी भरतीसाठी घेण्यात येणार्या परीक्षेकरिता अभ्यासक्रमही निश्चित करण्यात आला असून, संपूर्ण राज्यातील परीक्षार्थींसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे.
भरती परीक्षाकरिता लिंक ओपन झाल्यावर नोंदणी करता २१ दिवसांचा मुदत कालावधी असणार आहे. राज्यभरातून किमान पाच लाख विद्यार्थी उमेदवार ही परीक्षा देतील, असा अंदाज आहे. त्यासाठी प्रशासकीय प्रक्रिया करून १७ ऑगस्ट किंवा १२ सप्टेंबर या दिवशी परीक्षा घेण्याची तयारी दाखवण्यात आली आहे.
या भरतीसाठी पूर्वी ३०० ते ५०० रुपयांच्या आत शुल्क आकारला जायचा, परंतु तलाठी परीक्षेसाठी अर्ज करणार्या खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपये, तर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्याला ९०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.