बीड : जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीसह विविध मागण्यासाठी अर्जून ढाकणे यांचे वडगाव ढोक येथील स्मशानभूमीत गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरु असून चार दिवस उलटून ही अद्याप ही उपोषणाचा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यामुळे गावकऱ्यांची प्रशासन विरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याआधी ही ढाकणे यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला दिले होते.
अर्जुन अंबादास ढाकणे यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक येथील सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण हटविण्यात यावे व गावातील ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारा संदर्भात यापूर्वी दि. १३/०९/२०२२ रोजी चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना अर्ज दिला होता व त्यावर कसलीही कार्यवाही करण्यात आली नाही. तसेच आमच्या गावात ग्रामपंचायत हद्दीत सार्वजनिक जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केली असल्याने गावाची वाहतुकीची कोंडी होत असून गावातील नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायत यांना वेळोवेळी सांगून देखील भ्रष्ट ग्रामसेवक आणि प्रशासनाने याबाबत कसल्याही प्रकारे नोंद घेतलेली नाही. या निषेधार्थ अर्जून ढाकणे यांनी आमरण उपोषणाचे पाऊल उचलले असून त्याचे उपोषण हे गावामधून शेतात जाणारे रस्ते ते ३३ फुटाचे आहेत त्या रस्त्यावर घरे व कंपाऊंड बांधले आहेत ते रस्ते पूर्ण मोकळे करण्यात यावेत, वडगाव ढोक गावासाठी १६ एकर गावठाण आहे त्यावर पूर्ण अतिक्रमण करून घरे व जमीन केली जाते त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे व ते गावठाण मोकळे करण्यात यावे, गावासाठी नवीन संपादित गावक्षेत्र गावठाण ५ एकर २८ आर जमीन संपादित केली आहे त्यामध्ये घरे व जमीन पिकवली जात असून ती सर्व जमीन शासनाने ताब्यात घेऊन ग्रामपंचायतच्या नावे करण्यात यावी, जुन्या शाळेचे दानपत्र असून ते जमीन मूळ मालकाच्या नावे आहे आज पर्यंत ग्रामपंचायतने ते नावे करून घेतलेले नाही ती जमीन शाळेच्या नावे करण्यात यावी, गावाच्या सर्व बाजूने ते ३३ फुटाच्या रस्ते आहेत ते पूर्ण अतिक्रमण केलेले आहेत.
ते रस्ते गावासाठी मोकळे करून देण्यात यावेत, नवीन शाळेच्या नवीन शाळेला जाण्या येण्यासाठी रस्ता नाही तो रस्ता शासनाने करावा, ग्रामसेवकाने रजिस्ट्री नसताना मालकी हक्कात नावाला आळे मारून दुसरे नावे लिहिली जात आहेत, काहीच्या जागा मालकी हक्कात लावून दिल्या जात आहेत, काही जागा जास्त करून दिल्या जात आहेत, असे गैरप्रकारचे काम करणाऱ्या ग्रामसेवकावर योग्यती कार्यवाही करण्यात यावी, वडगाव ढोक शिवारात धाबे व किराणा दुकानात दारू मिळते ती पूर्णपणे बंद करण्यात यावी. तसेच गावातील काही लोक बुवाबाजी करत आहेत लोकांमध्ये अंधश्रद्धा पसरवत आहेत, जादूटोणा, भानामती करत आहेत अशा लोकांचा अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी बंदोबस्त करण्यात यावा, वडगाव ढोक येथील गुत्तेदाराने खासदार फंड स्वतःच्या शेतात वापरला आहे. ग्रामसेवक व गुत्तेदार या दोघांनी संगणमताने भ्रष्टाचार केला आहे, याची पूर्ण चौकशी करून दोषी व्यक्तीवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी सुरू आहे.
आर्जुन ढाकणे यांचे गेल्या चार दिवसांपासून वडगाव ढोक येथील स्मशानभूमीत आमरण उपोषण सुरू असून चार दिवस उलटून ही अद्याप ही उपोषणाचा प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नसल्यामुळे गावकऱ्यांची प्रशासन विरूद्ध तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.