बीड : आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे. दिनांक १५ ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाकडून निवडणुकी दरम्यान आचारसंहितेच्या नियमांचे पालन निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना काटेकोरपणे करण्याचे आवाहन केले आहेत मात्र भीमराव धोंडे यांनी निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तुडवत आष्टी शहरांमध्ये शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते एकत्र करत शक्ती प्रदर्शन केले.
या शक्ती प्रदर्शनामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्वजाचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी केल्याचे पाहायला मिळत आहे. याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निळ्या ध्वजा भोवती घेराव घालून ‘आष्टी का आमदार कैसा हो धोंडे साहेब जैसा हो’ अशा घोषणा दिल्या गेल्या आहेत.
एवढेच नाही तर धोंडे यांच्यासोबत एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी गळ्यामध्ये राजकीय पक्षाचा गमछा घालून जोरजोरात घोषणाबाजी करत होता. धोंडे यांनी सुध्हा गळ्यात विविध रंगाचे गमच्छे घालून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे, धोंडे यांनी शासकीय कार्यालयाच्या दारातून घोषणाबाजी करत ही रॅली काढली होती.
रॅली मध्ये भीमराव धोंडे यांचा फोटो आणि त्यावर भावी आमदार असे लिहिले होते ही रॅली शहराच्या विविध मुख्य ठिकाणाहून काढून लक्ष्मी लॉन्स आष्टी येथे समारोप करून भव्य मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या मुख्य बॅनर वर सर्व महापुरुषांचे फोटो लावून भारतीय जनता पार्टी पक्षाचे कमळ हे चिन्ह ठळक स्वरूपात लावले होते.
भीमराव धोंडे यांनी ही रॅली, कार्यक्रम आणि सर्व फोटोज् आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केले आहेत त्यामुळे आचारसंहितेचे नियम फक्त सर्वसामान्य निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारालाच आहेत का? प्रस्थापित, धन दांडगे, पक्षाचे बलाढ्य नेते यांना आचारसंहिता आणि निवडणूक आयोगाचे नियम लागू होत नाहीत का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
एवढेच नाही तर धोंडे यांनी मेळाव्याच्या भाषणांमधून उपस्थित मतदारांना डॉ. बाबासाहेबांच्या पुतळा उभारण्याची घोषणा केली, निवडणुकी दरम्यान काही अडचणी आल्या संपर्क करा आम्ही तुमच्या गावात येऊ, निवडणुकीच्या काळात आमच्या बाजूला उभे रहा अशी विनंती करून मतदारांना आकर्षित केले आहे व अनेक आश्वासनेही दिली आहेत.
त्यामुळे निवडणुक आयोगाचे नियम भीमराव धोंडे यांनी धाब्यावर बसवले आहेत असे म्हणायला हरकत नाहीत यावर निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
—————————————————–
आचारसंहिता लागू होताच निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी जी नियमावली लागू केली ती जिल्हा माहिती कार्यालयातून मिळालेली माहिती आणि नियमावली खालीलपरमाणे आहे.
निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने
जिल्हा प्रशासनाकडून आदेश निर्गमित
बीड दि. 17 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध घातले आहेत. तशा स्वरूपाचे आदेश जिल्हादंडाधिकारी अविनाश पाठक यांनी निर्गमित केले आहेत.
सदरील आदेश प्रत्येकावर तामील करणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश ध्वनीक्षेपकावर पोलिस विभागाने जाहीर करून त्यास प्रसिद्धी द्यावी, सदरील आदेश २५ नोव्हेंबरपर्यंत अंमलात राहतील, असेही निर्गमित आदेशांमध्ये नमूद आहे. वेगवेगळ्या आदेशात पुढील बाबी नमूद आहेत.
शासकीय, निमशासकीय परिसर
जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था आणि विश्रामगृहांच्या आवारात कोणत्याही राजकीय पक्षाने, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे, सदरील आवाजाचा वापर राजकीय कामासाठी करणे, रॅली काढणे, निवडणुकीसंबंधाने पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट, पेंटिंग्स, होर्डिंग्ज लावणे, निवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे, किंवा कार्यालयीन आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे, किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणुकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इ.बाबी नियंत्रित करणे या कृती करण्यास निर्बंध घालण्यात आला आहे.
सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण
निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स, व जाहिराती लावून सार्वजनिक मालमत्तांचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमत्ता विद्रुपित करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार नगरपालिका, नगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणुकीच्या कालावधीत होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स व जाहिराती प्रदर्शित करताना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच पूर्व परवानगी संपल्यानंतर ते दूर नष्ट करून इमारती, मालमत्ता पूर्ववत करून घेणे, जाहिराती तत्काळ काढून घेणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
मतपत्रिका छपाई
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी, त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी, मुद्रणालय मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकाने, प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापताना इतर उमेदवाराचे नाव, त्यांनी नेमून देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी निवडणूक आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे, आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारात नमुना मतपत्रिका छापण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले आहेत.
यावरही असतील निर्बंध
सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण इ. करण्यावर तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रूग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर, राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचे वाहनाच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध असतील.
प्रचार वाहनांवरील झेंडा, कापडी फलक
प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून दोन फूट उंची पेक्षा जास्त राहणार नाही. वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. वाहनावर लावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनांव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही.
ध्वनीक्षेपकाचा वापर
ध्वनीक्षेपकाचा वापर पोलिस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी सहा वाजण्यापूर्वी व रात्री दहा नंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष व त्यांचे उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनीक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
रहदारीस अडथळा नको
राजकीय पक्षांनी, निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणुकीसंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्पलेटस्, कटआऊटस, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
खासगी व्यक्तीच्या जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध
निवडणुकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीच्या संबंधित जागा मालकाचे परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या पूर्व परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात येत आहेत, असेही नमूद आहे.