बीड : लोकसभा मतदार संघाचा विकास केला हे भाजपच्या उमेदवाराला पोलीस संरक्षणात सांगत फिरावे लागणे हे मतदार संघाचे दुर्दैव आहे. आजपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील बेकारी व विकास याकडे लक्ष दिले नसल्याचा हा परिणाम असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई येथे माध्यमांशी बोलताना केला.
बीड लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी रविवारी सकाळी अंबाजोगाई येथे योगेश्वरी मातेचे दर्शन घेऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी चनई येथील हजरत ख्वाजा शेख मसूद किरमाणी यांच्या दर्ग्याला चादर अर्पण करीत दुआ मागितली. त्याचबरोबर संघर्ष भूमीतील महाकरुणीक तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी प्रा. ईश्वर मुंडे यांच्या निवासस्थानी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी सोनवणे म्हणाले की, मागील १५ वर्षापासून एकाच कुटुंबात सलग १५ वर्षे जिल्ह्याची खासदारकी असताना देखील त्यांनी विकास केलेला नाही. ते विकास केला असे जनतेला भूलथापा देत असून विकास केल्याचे सांगण्यासाठी त्यांना पोलीस संरक्षणात फिरावे लागणे म्हणजे या मतदार संघाचे दुर्दैव आहे असल्याची टीकाही त्यांनी केली
महामार्गाच्या कामावर सोनवणे म्हणाले की, मागील १० वर्षापासून सुरू असलेले मतदार संघातील रस्त्याचे काम अद्याप ही पूर्ण झालेले नसून अनेक ठिकाणी अर्धवट काम राहिल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत. लोकांना नाहक जीव गमवावा लागलेला आहे. असे सांगून त्यांनी आमच्याकडे जातीपातीच्या राजकारणाला थारा नसून मराठा समाज हा भाजपाला कंटाळलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आणि राज्यघटनेनुसार आरक्षणाचा अधिकार असताना देखील आरक्षणाची मागणी करणाऱ्या मराठा समाजातील तरुणावर लाठी चार्ज करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. म्हणून भाजपबरोबर कोणताही समाज राहिलेला नसल्याचे ते म्हणाले.
त्यांच्यासोबत माजी आमदार पृथ्वीराज साठे, डॉ. नरेंद्र काळे, प्रा. ईश्वर मुंडे, अमर देशमुख, बबन लोमटे, ॲड. शहाजहान पठाण, अंकुश ढोबळे, भगवानराव ढगे, सुधाकर जोगदंड, तारिकअली उस्मानी, शिवसेनेचे मदन परदेशी, महिला आघाडीच्या संजीवनी देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व युवक उपस्थित होते.
————–
अंबाजोगाईत अनेकांच्या घरी भेटी
महाविकास आघाडीचे उमेदवार शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांनी अंबाजोगाई शहरातील डॉ. पांडुरंग पवार, जेष्ठ नेते चंद्रशेखर वडमारे, बबन लोमटे, ॲड. राजेसाहेब लोमटे, शरद लोमटे,सतीश लोमटे, भिमसेन लोमटे यांच्या घरी भेटी देत चर्चा केली. यावेळी त्यांचा सत्कार करीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या.