औरंगाबाद : मराठवाड्यात नांदेड व हिंगोली या दोन जिल्ह्यात काही भागात अतिवृष्टी असून उर्वरित संपूर्ण मराठवड्यामध्ये पावसाचा मोठा खंड असल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला असून त्यांना अंतरीम दिलासा मिळवून देण्यासाठी सर्व मंडळांमध्ये तात्काळ पंचनामे सुरू करा. या पंचनाम्यांसाठी कृषी, महसूल त्याचबरोबर पिक विमा कंपनीलाही सोबत घ्या, असे निर्देश राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज प्रशासनास दिले आहेत.
अग्रीम पिक विमा असेल किंवा अंतरिम पीक विमा असेल याचा नुकसान भरपाई मध्ये शेतकऱ्याला मोठा आधार मिळतो. सध्याची मराठवाड्यावरील परिस्थिती ही संकटाची असून शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा मिळावा यासाठी संबंधित सर्व पीक विमा कंपन्यांनी महसूल व कृषी विभागासोबत मिळून मंडळ व गावनिहाय पंचनामे येत्या सात दिवसांच्या आत पूर्ण करावेत, अशा सक्तीच्या सूचना कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मराठवाड्यात निर्माण झालेली दुष्काळ सदृश्य परिस्थिती यावर नियंत्रण मिळवणे तसेच या काळात शेतकऱ्यांना दिलासा देणे, पिण्याच्या पाण्याचे, जनावरांच्या चाऱ्याचे आदी नियोजन करणे यासंदर्भात आज छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे, आ.सतिश चव्हाण तसेच कृषी आयुक्त सुनील चव्हाण, विभागीय आयुक्त, आठही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच कृषी विभागाचे अधिकारी, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे अधिकारी, पशु संवर्धन विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने पिके संकटात आली असून दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी अशा सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तालुका स्तरापर्यंत जाऊन मराठवाड्यातील सर्वच तालुक्यांचा कंटिन्जन्सी प्लॅन येत्या आठ दिवसाच्या आत तयार करून सादर करावा असे आदेश धनंजय मुंडे यांनी दिले आहेत.
आगामी १७ सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा सुवर्ण महोत्सव असून यावेळी मराठवाड्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच सततच्या दुष्काळावर कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना करणे या संदर्भात मराठवाड्यातील सर्व प्रतिनिधींच्या विनंतीवरून मंत्रिमंडळाची विशेष बैठक छत्रपती संभाजीनगर येथे घेण्यात येणार आहे, अशी माहिती धनंजय मुंडे यांनी या बैठकीत दिली; तसेच मंत्रिमंडळाच्या या विशेष बैठकीमध्ये मराठवाड्याला दीर्घकालीन फायदा देणाऱ्या अन्य सर्वच योजनांचे आराखडे तसेच रखडलेल्या कामांचे प्रस्ताव तयार करून संबंधित मंत्रिमंडळ बैठकी आधी सादर करण्याबाबत धनंजय मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प त्याचबरोबर जलयुक्त शिवार टप्पा दोन या दोन्ही योजनांचा जास्तीत जास्त फायदा मराठवाड्याला होईल, यादृष्टीने या काळात नियोजन करण्यात यावे, तसेच गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार ही योजना तातडीने कार्यान्वित करून या योजनेतून करण्यात येत असलेल्या कामांचा मंडळनिहाय अहवाल दैनंदिन स्वरूपात मंत्रालयास पाठवण्यात यावा, असेही निर्देश धनंजय मुंडे यांनी या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान मराठवाड्यातील बीड जिल्ह्यासह विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस मोजमाप करणाऱ्या यंत्राद्वारे मिळालेल्या अहवालामध्ये अनेक त्रुटी दिसून येत आहेत. पावसाचा खंड दाखवण्यामध्ये देखील अनेक त्रुटी दिसून येत असून याबाबत धनंजय मुंडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत यामध्ये मानवी चुका आढळल्यास त्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात यावी, असे निर्देशही विभागीय आयुक्तांना दिले आहेत.
मराठवाड्यातील सर्व लघु मध्यम व मोठ्या जलप्रकल्पांचे जलसाठे तपासून आगामी काळात गरज भासल्यास पिण्याचे पाणी राखून ठेवण्याबाबतही संबंधितांना सूचना देण्यात आल्या असून त्याचबरोबर गाळपिर्याचा जास्तीत जास्त वापर करून आगामी काळात गरज पडू शकते या दृष्टीने जनावरांच्या चाऱ्याची ही सोय करून ठेवावी असेही संबंधितांना या बैठकीत निर्देश देण्यात आले.
दरम्यान या बैठकीनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील पावसाने ओढ दिलेल्या विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अग्रीम पीक विमा किंवा अंतरिम पिक विमा मिळण्यासाठी तातडीने पंचनामे केले जाणार असून, हे पंचनामे 7 दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामुळे मराठवाड्यात संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून अंतरिम दिलासा नक्की मिळेल, अशा आशा पल्लवित झाल्या आहेत.
सत्काराला नकार
दरम्यान बैठकीच्या सुरुवातीस विभागाच्या वतीने धनंजय मुंडे यांचे सर्वच मंत्रिमहोदयांचा सत्कार स्वागत करण्यात येणार होता मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याने उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी आता स्वागत करणे ऐवजी जबाबदारीने कामावर भर द्यावा असे म्हणत धनंजय मुंडे यांनी सत्कार स्वीकारण्यास नकार दिला.