मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजस्थान येथील सीकर येथे विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित किसान संमेलनाच्या माध्यमातून पीएम किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे देशभरातील साडे आठ कोटी लाभार्थी शेतकऱ्याना एका क्लिकवर वितरण करण्यात आले. याव्दारे महाराष्ट्रातील तब्बल 85 लाख 66 हजार लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 1866 कोटींचा चौदावा हप्ता वितरित करण्यात आला आहे.
सीकर राजस्थान येथे पार पडलेल्या या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषी मंत्री धनंजय मुंडे तसेच मंत्री दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थान येथून ऑनलाइन पद्धतीने हजेरी लावली. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी तसेच शेतकरी प्रतिनिधीही उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या वतीने यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, धनंजय मुंडे, दादाजी भुसे यांचे स्वागत करण्यात आले, तसेच शासनाच्या वतीने कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दरम्यान कृषी विभागाच्या वतीने या कार्यक्रमात व्हर्च्युअल पद्धतीने शेतकऱ्यांना सहभागी होता यावे, यासाठी विशेष आयोजन करण्यात आले होते. कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय, जिल्हा – तालुका कृषी कार्यालय, तसेच गावांमध्ये अशा राज्यभरात 12980 ठिकाणी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले व याद्वारे राज्यातील सुमारे साडे पाच लाख शेतकऱ्यांनी या संमेलनात सहभाग घेतला.
पीएम किसान सन्मान योजनेच्या धर्तीवरच राज्य सरकारने शेतकऱ्यांना वाढीव आणखी 6 हजार रुपये अर्थसहाय्य वर्षाला मिळावे यादृष्टीने नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली असून, या योजनेच्या अंमलबजावणीला देखील लवकरच सुरुवात होईल, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिली , तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार व्यक्त केले.