पुणे : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतर आता राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ माजली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत जायचं की अजित पवार यांना पाठिंबा द्यायचा या द्विधा मनस्थितीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, आमदार सुद्धा अडकले आहेत. अशात आता अजित पवार यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना फोन करून सोबत राहण्यास सांगितलं आहे. तर जिल्हाअध्यक्षांनी पाठिंबा कुणाला द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी बैठका बोलावल्या आहेत.
राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे वैतागून चक्क खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. अमोल कोल्हे यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. पक्षात पडलेली फूट आणि झालेली द्विधा मनस्थिती यातून अमोल कोल्हे हे खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अमोल कोल्हे आजच शरद पवार यांच्याकडे त्यांचा राजीनामा सोपविणार आहेत. रविवारपासून राष्ट्रवादीत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या शपथविधी वेळी कोल्हे हे उपस्थित होते. पण त्यांनी आता खादारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अमोल कोल्हे यांनी काल शरद पवार यांच्याशी संपर्क साधला होता. तसेच मी तुमच्यासोबत असल्याचं स्पष्ट केलं होतं. तसेच खासदारकीबाबत निर्णय घेणार असल्याचंही म्हटलं होतं. त्यावर मी उद्या मुंबईत आहे. उद्या या बोलू. तुम्हाला जो योग्य वाटेल तो निर्णय घ्या, असा सल्ला शरद पवार यांनी त्यांना दिला होता. त्यानंतर अमोल कोल्हे यांनी खासदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.