अहमदनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी कुटुंबातील भाऊसाहेब मोहनीराज काळे (वय ५६) मंगल भाऊसाहेब काळे (वय ५२) मु. पो. वाकडी, ता. नेवासा, जि. अहमदनगर या वारकरी दांपत्यास शासकीय पूजेचा मान मिळाला. काळे दांपत्य २५ वर्षापासून भास्करगिरी महाराज यांच्या सोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करीत आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेचा मान मिळालेल्या वारकरी दांपत्यास एक वर्षासाठी मोफत प्रवासाची सेवा दिली जाते. त्या मोफत पासचे वितरण श्री. शिंदे यांच्या हस्ते या वारकरी दांपत्यास करण्यात आले.
कार्यक्रमाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि प्रताप जाधव, आमदार समाधान आवताडे, भरत गोगावले, मंगेश चव्हाण, बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आदी उपस्थित होते.