पुणे : पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणानंतर तो धाडसी तरुण ‘लेशपाल जवळगे’ चांगलाच चर्चेत आला आहे. लेशपाल याचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जातं आहे. अनेक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांनीही लेशपाल याचं कौतुक केलं आहे शेवटी लेशपाल याला सांगावं लागलं की मला सत्काराला बोलावू नका. जीव धोक्यात घालून लेशपालने कोयता हल्ल्यातून एका तरुणीचा जीव वाचवला.
कोयता हल्ल्यातून तरुणीला वाचवल्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाने लेशपाल जवळगे याच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते लेशपाल जवळगे याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महादेव जानकर यांनी लेशपाल जवळगे याच्या धाडसाचं कौतुक करून त्यानं यूपीएससीत यश मिळवावे अशी आशा व्यक्त केली.
यशपालने यूपीएससी पास करून आयएएस किंवा आयपीएस व्हावं, अशी आशा व्यक्त करतानाच आम्ही लेशपाल याचं पालकत्व स्वीकारत असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. तसेच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी देखील लेशपाल जवळगे याचं पालकत्व स्वीकारलं पाहिजे. त्यासाठी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं महादेव जानकर यांनी सांगितलं.