बीड : २० मे रोजी आयोजित महाप्रबोधन यात्रेची तयारी उत्साहात सुरू आहे. शिवसैनिकांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. आज पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बीडची ही महाप्रबोधन यात्रा लक्षणीय ठरणार आहे. शिवसैनिकांनी कठोर मेहनत घ्यावी असे आवाहन संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांनी केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप, आप्पासाहेब जाधव, माजी आमदार ्सुनील धांडे, विलास महाराज शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.
बीडमध्ये येत्या २० मे रोजी शिवसेनेच्या महाप्रबोधन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत, उपनेत्या सुषमा अंधारे या महाप्रबोधन यात्रेत मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेना नेते खा.संजय राऊत पहिल्यांदाच बीडमध्ये येत आहेत. त्यांचे भाषण ऐकण्यासाठी शहरवासियांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. महाप्रबोधन यात्रेची जय्यत तयारी सुरू आहे. सर्व पदाधिकार्यांना कामाचे वाटप करून देण्यात आले आहे. शिवसैनिकांमध्येही उत्साह निर्माण झाला आहे.
आज संपर्कप्रमुख धोंडू पाटील यांच्या उपस्थितीमध्ये पदाधिकार्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले. यात बोलताना ते म्हणाले, शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी ‘देता की जाता’ या आंदोलनाचे आम्ही साक्षीदार आहोत. बीडमध्ये आयोजित या कार्यक्रमासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. तो कार्यक्रम न भुतो न भविष्यती झाला होता. अगदी असाच मेळावा येत्या २० तारखेला बीडमध्ये होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष बीडकडे लागले आहे. बीडची ही महाप्रबोधन यात्रा सस्मरणीय ठरणार आहे. त्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले. तत्पूर्वी जिल्हाप्रमुख अनिल जगताप मार्गदर्शन करताना म्हणाले, शिवसेनेने तुम्हा आम्हाला सर्व काही दिलं, मायेची उबही दिली.
आता वेळ आली आहे, पक्षासाठी काही तरी करायची त्यासाठी महाप्रबोधन यात्रा यशस्वी करणे हे आपले कर्तव्य आहे. आणि ते आपण पार पाडू. बीडमधील या यात्रेची संपूर्ण राज्यात चर्चा होईल असा यशस्वी मेळावा आपण करून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी बोलताना सांगितले. कोणत्याही निमंत्रणाची आणि वाहनाची वाट बघू नका. गावागावात, घराघरात जा, महाप्रबोधन यात्रेचा प्रसार करा असं आवाहन बीड जिल्हा शिवसेनेच्या वतिने करण्यात आले आहे.