गेवराई / बीड : जमियत उलमा-ए-हिंद ही भारतीय मुस्लिमांची सर्वात जुनी आणि सर्वात मोठी सामाजिक धार्मिक संघटना आहे.या संघटनेकडून गेवराई मतदार संघातील प्रसिद्ध समाजसेविका मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विशेष सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. हा पुरस्कार आपल्याला ऊर्जा आणि प्रेरणा देत राहील, मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासोबत काम करणारे मला मदत करणारे या सर्वांना समर्पित करते, असे उदगार सन्मान स्वीकारताना मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर यांनी व्यक्त केले.
समाजामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा जमियत उलमा पुणे यांच्याकडून गौरव करण्यात येतो यावर्षी गेवराई मतदार संघाच्या प्रसिद्ध समाजसेविका मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर यांचा विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.हा सन्मान सोहळा पुणे येथील पारगाई लॉन, कोंढवा येथे नुकताच पार पडला. खा.मौलाना मोहिबुल्ला नदवी व प्रमुख पाहुणे जळगावचे मुफ्ती हारून नदवी यांच्या हस्ते विशेष गौरव पुरस्कार सोहळा संपन्न झाला.
मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर यांनी आपल्या भागात 5 हजाराहून अधिक गरीब लोकांच्या डोळ्यांचे मोफत ऑपरेशन करून त्यांना दृष्टी देण्याचे महान कार्य केले आहे. 3900 नागरिकांना मोफत शिर्डी यात्रा, सोळाशे नागरिकांना मोफत पंढरपूर तुळजापूर येडेश्वरी यात्रा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, स्वच्छता अभियान, मतदान कार्ड बनवणे, शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल, महिलांच्या न्यायासाठी नेहमी आवाज उठवणे, गरिबांना मदत करणे,कोरोना काळातील सामाजिक दायित्व,आदी उपक्रम राबवित आलेले आहेत. मयुरीताई बाळासाहेब मस्के -खेडकर कुटुंब सर्व जाती धर्माच्या लोकांना मदत करण्यास आणि त्यांचे कार्य करण्यास सदैव तत्पर राहतात. त्यांचे कार्य पाहून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशांत जगताप माजी महापौर पुणे, नजीर तांबोळी, काझी इद्रिस,हाजी गुलजार शेख,एड. अयुब इलाही बख्श,आसिफ खोकर आदी उपस्थित होते.
यावेळी मयुरी बाळासाहेब मस्के -खेडकर यांनी मंचावरील सर्व प्रमुख पाहुण्यांना वंदन केले व कार्यक्रमात पुरस्कार दिल्याबद्दल आयोजकाचे आभार मानले,तसेच आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्व लोकांकडून आशीर्वाद मागितले व हे प्रेम कायम ठेवण्याचे आवाहन मयुरीताई बाळासाहेब मस्के-खेडकर यांनी केले.कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.